शिरूर (पुणे) -पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तोबा गर्दी झाली. आयोजकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र, दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याची कल्पना असतानाही मतदारसंघात दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या गावांत कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली. एकीकडे मुख्यमंत्री सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पटवून देत असताना मंत्र्यांना मात्र कोरोनाचा विसर पडला की काय? असा प्रश्न पडत आहे.
हेही वाचा -दीड वर्षानंतर नव्या रुपात डेक्कन एक्स्प्रेस सुरू, विस्टाडोममधून प्रवास होणार आनंददायी
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव, आमदार अशोक पवार यांच्यासह शिरूर तालुक्यातील अनेक राजकीय पुढारी कोरोनाचे गांभीर्य विसरून एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. या वेळी कार्यकर्त्यांची व नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे येत्या काही दिवसांत शिरूर तालुक्यात डेल्टा प्लस व कोरोनाची तिसरी लाट आल्यास नवल वाटायला नको. शिरूर तालुक्यातील ज्या गावात एकही रुग्ण नाही त्या गावात मंत्र्यांचा दौरा झाला. मात्र, या गावात कोरोनाचा फैलाव झाला तर याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.