पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड पुकारत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी काल शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. तसेच मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले, तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. यामागे भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांची ही गुगली निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी करणारी असल्याची चर्चा आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर अजित पवारांच्या बंडामुळे अन्याय होत असल्याचा सुर आता उमटत आहे. यावर पुणे ग्रामीण भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीस यांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत.
पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपची जिरणार : कालच्या शपथविधीमुळे भाजपची की, राष्ट्रवादीची ताकद वाढणार? असा पहिला प्रश्न नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे. पवारांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठावंतांची जिरणार का असा सवाल देखील पारखी यांनी विचारला आहे. भाजप वाढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते काम करतात, त्याच्यासाठी तुम्ही काही दुसरी व्यावस्था केली का? असा थेट सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे. पारखी यांनी या पत्राद्वारे फडणवीस यांना पाच प्रश्न विचारले आहेत. साहेब, जमल्यास उत्तर द्या, अशी साद पारखी यांनी घालत आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा सवाल फडणवीसांना केला आहे.