पुणे - दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या प्रत्येकाचेच लक्ष आभाळाकडे लागले आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणामध्ये गेलेले वाडा गाव व गावातील शिवमंदिर आता दिसू लागले आहे. जुने ते सोने असे म्हटले जाते आणि याच जुन्या वास्तूतून जुन्या आठवणींना अनेक वर्षांनंतर पुन्हा उजाळा मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या भीमा नदीच्या तीरावर वाडा हे गाव वसलेले आहे. १९७२ साली दुष्काळाचे संकट आल्यानंतर चासकमान हा जलाशय उभारण्यात आला. त्यानंतर याच वाड्यांसह अनेक गावांचा परिसर पाण्याखाली गेला. पाण्याखाली गेलेल्या वाडा गावातील एकमेव आठवण म्हणून हे प्राचीनकालीन शिवमंदिर आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेले गाव, मंदिर पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे या गावात राहणाऱ्या नागरिकांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.