पुणे -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्यावर शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात स्मृती इराणींविरोधात खटला दाखल
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी हा खटला दाखल करण्यात आला. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या शिक्षणाविषयीची निवडणुक आयोगाला दिलेली माहिती ही चुकीची असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांनी २०१४ च्या निवडणुकीतही खोटी माहिती दिल्याचेही उघडकीस आले आहे.निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या उद्देशाने इराणी यांनी त्यांची २००४ मधील बी.ए.ची पदवी १९९६ मध्येच पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. तर फिर्यादी यांनी संकेतस्थळावर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना इराणी यांनी बीए पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. याबरोबरच पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचेही निदर्शनास आले. या फसवणूकीची लेखी तक्रार देऊन देखील खडक पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्यादी यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.
दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती देत स्मृती इराणी यांनी मतदार यांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण खडक पोलीस स्टेशन यांच्याकडे तपासाकरिता पाठविण्यात यावे, तसेच हा खटला गुणदोषावर चालवून आरोपीला कडक शासन करण्यात यावे. असा विनंती अर्ज कोर्टाला सादर करण्यात आल्याचे अॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले.