पुणे - प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने तयार करण्यात आलेले आदेश बनावट असल्याची माहिती असूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून शेरे मारले. तसेच त्याद्वारे शिरूर तालुक्यातील तब्बल ६० एकराहून अधिक सरकारी जमिनीचा बेकायदा व्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदार व अन्नधान्य वितरण परिमंडळ अधिकारी गीतांजली नामदेवराव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात यापूर्वी कासारी तलाठी सचिन देवप्पा काळेला आणि लिपिक सुभाष नळकांडे यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील लिपिक चंद्रशेखर मुरलीधरन ढवळे यांनी बनावट आदेश तयार केले. हे आदेश बनावट असल्याचे माहीत असूनही आरोपी सुभाष नळकांडे याने त्याचा वापर केला. त्या आदेशावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने शिरूर तहसील कार्यालयातील तत्कालीन पुनर्वसन रमेश वाल्मीकी यांनी अर्ज तयार केले. त्यावर तत्कालीन नायब तहसीलदार असलेल्या गीतांजली गरड यांनी त्यावर शेरे घातले. या शेऱ्याच्या आधारे सरकारी जमिनींचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने कासारीचे कामगार तलाठी सचिन देवप्पा काळेला यांनी फेरफार रजिस्टर नोंदी घेतल्या.
त्यांनी पुन्हा प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या नावाने खोटे अर्ज तयार करून या शासकीय कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी जमा असलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग बदलण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वरीष्ठांना असतानाही त्याबाबतचे अर्ज शिरूर तहसीलदार कार्यालयात दाखल केले. या सर्व अर्जांवर नायब तहसीलदार गीतांजली गरड यांनी शेरे मारले आणि त्या शासकीय जमिनींचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे झालेल्या जमिनींचे भोगवटा वर्ग बदलाचे गाव कामगार तलाठी काळेला यांनी फेरफार रजिस्टरी नोंद केली. त्या नोंदी तत्कालीन मंडळ अधिकारी बळीराम खंडूजीकडे यांनी कोणत्याही बाबींची खात्री किंवा पडताळणी न करता प्रमाणित केल्या. या प्रकरणामधील अर्ज व त्यासोबतचे कागदपत्र हे बनावट व बेकायदेशीर असतानाही त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे.