पुणे- मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक 17 जागांसाठी पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसेपाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील राजकीय वैर सोडून मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत. या दोघांनींही ग्रामपंचायत निवडणूक एकत्र येऊन लढवण्यचाा निर्णय घेतला आहे. मात्र, हे दोन्ही पाटील सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता मिळविण्यासाठी एकत्र आल्याचा आरोप करत भाजपने या निवडणुकीत या दोन पाटलांच्या विरोधात मोठे आव्हान उभे केले आहे.
मंचर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वळसे-आढळराव पाटील एकत्र; भाजपाने दिले आव्हान - दिलीप वळसे पाटील आढळराव पाटील एकत्र
मंत्री दिलीप वळसेपाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील राजकीय वैर सोडून मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत. या दोघांनींही ग्रामपंचायत निवडणूक एकत्र येऊन लढवण्यचाा निर्णय घेतला आहे.
गाव पातळीवर निवडणुकीसाठी दोन पाटील एकत्र...
कोरोनावर मात करण्यासाठी मंचर ग्रामपंचायतीने मंचर पॅटर्न उभा करत 'आपले मंचर, माझा अभिमान' असा नवीन प्रयोग उभा केला. यादरम्यान आढळरावपाटील व वळसेपाटील या दोन्ही नेत्यांनी राजकारण न करता कोरोनावर मात करण्यासाठी मोलाची मदत केली. याच काळात दोन्ही पाटलांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना मदतीचा हात दिला. यातूनच मंचर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दोन्ही नेते आज आघाडीचा धर्म पाळून पाळत आहेत. मंचर ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षीय पातळीवर न लढता गाव पातळीवर लढवली जावी, यासाठी ते दोघे एकत्र आले असल्याचे मत मंचरचे माजी सरपंच दत्ता गांधी यांनी व्यक्त केले.
सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता" भाजपाचा आरोप
मंचर ग्रामपंचायत उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या शहरीकरणाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी आढळरावपाटील व वळसेपाटील या दोन परस्पर विरोधकांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र जनतेची कुठलेही प्रश्न मार्गी लावले नाहीत. आजही मंचर शहराला शुद्ध पाणी नाही, कचरा समस्या गंभीर आहे, आरोग्य समस्या, घनकचरा नियोजन नाही. या समस्या आजपर्यंत सोडविण्यात यांना यश आले नाही. तरीही एकमेकांचे विरोधक असणारे आज एकत्र आले आहेत. म्हणजे "सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता" निर्माण करण्यासाठी दोन पाटील एकत्र आल्याचा गंभीर आरोप करत भाजपने या दोघांच्या आघाडी समोर मोठे आव्हान उभे केले आहे.