पुणे -कोविशिल्ड ही आज भारतभर पाठवण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमधून एक कोटी दहा लाख डोस हे भारतभरात पाठवण्यात आले. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून इन्स्टिट्यूटचे सर्व कर्मचारी, शास्त्रज्ञ, अधिकारी हे या लसीच्या निर्मितीसाठी झटत होते. आज या लसीचे वितरण होत असताना सीरम इन्स्टिट्यूटमधील कर्मचारी, पदाधिकारी, शास्त्रज्ञ तसेच कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी जल्लोष केला. आज सायंकाळी कंपनीच्या आवारात सर्व कर्मचारी अधिकारी एकत्र आले. टाळ्यांच्या गजरात त्यांनी आदर पूनावाला तसेच इतर मुख्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळेस आदर पुलावाला यांनी कर्मचाऱ्यांचे तसेच शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. सर्वांनी एक ग्रुप फोटोदेखील काढला.
सीरम इन्स्टिट्यूटबाहेर जल्लोष आणखी उत्पादन सुरू -
देशभरात लसीकरण सुरू होण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. याअनुषंगाने आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वितरणाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली. तसेच आज पहाटे तीन कंटेनर लस घेऊन बाहेर पडले. तर उर्वरित कंटेनर लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला आम्ही एक कोटी दहा लाख डोस दिले आहेत. तसेच, आणखी उत्पादन सुरू असून एकूण दहा कोटी डोस आम्ही सरकारला देणार असल्याचेही अदर यांनी सांगितले. सुरुवातीला सरकारला आम्ही २०० रुपये प्रति डोस या दराने आम्ही लस देत आहोत. दहा कोटी डोसेसनंतर आम्ही ही लस एक हजार रुपये प्रति डोस या बाजारभावाने विकू, असेही अदर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सरकारच बोलत असल्याचा संशय - शेट्टी