पुणे -अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन ( Vikram Gokhale Passed Away ) झाले आहे. रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टील दिग्गज अभिनेता विक्रम गोखले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ( Dinanath Mangeshkar Hospital ) उपचार घेत होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अभिनयाचा वारसा मिळाला बालपणी - विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या बालपणीच मिळाला. त्याच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. गेली सात दशके ते नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज अशा सर्वक्षेत्रात कार्यरत होते.
अभिनयासह केले लेखन -अलिकडेच त्यांनी आपल्या कारकिर्दीवर लेखन करण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ''माझ्या अभिनय कारकीर्दीमध्ये आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांना मी शब्दरूप देत आहे. या अनुभवांनी मला खूप काही शिकविले. माझ्या जडणघडणीमध्ये योगदान देणारे रणजित देसाई, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सुरेश खरे, शेखर ढवळीकर, विजया मेहता अशा मान्यवरांसह माझ्यासमवेत काम करणारे सहकलाकार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. कलाकार म्हणून मी कसा घडत गेलो, वाचन आणि अभ्यासातून स्वत:ला कसा घडवत गेलो याचा पट मांडण्याचा हा प्रयत्न आहे. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका असे स्वतंत्र विभाग असतील. वेब मालिका या नव्या माध्यमासह अध्यापन क्षेत्रात मी केलेल्या कामातून आलेले अनुभव सध्या मी लिहीत आहे.''