महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HBD Dr. Amol Kolhe : अभिनेता, निर्माता, खासदार, महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चित नाव - डॉ. अमोल कोल्हे वाढदिवस ईटीव्ही भारत

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी राजे यांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली आहे. शिवसेना पक्षातून राजकीय प्रवास सुरू करून शिवसेनेत ते उपनेते म्हणून काम करीत होते. तसेच 2014 विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाची निवडणुकीत प्रचाराची धुरा देखील संभाळली होती.

Actor, NCP MP Dr. Amol Kolhe Birthday Special Story
डॉ. अमोल कोल्हे

By

Published : Oct 18, 2021, 6:01 AM IST

पुणे -महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. डॉ. कोल्हे यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी राजे यांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली आहे. शिवसेना पक्षातून राजकीय प्रवास सुरू करून शिवसेनेत ते उपनेते म्हणून काम करीत होते. तसेच 2014 विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाची निवडणुकीत प्रचाराची धुरा देखील संभाळली होती. पुणे जिल्ह्याचे ते शिवसेना संपर्कप्रमुख होते. त्यानंतर राजकारणातच असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून शिरूर मतदारसंघातून 3वेळा विजयी झालेल्या शिवसेनेचे उमेदवार आढळराव पाटील यांचा पराभव करत शिरूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

घर विकून केली मालिकेची निर्मिती -

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळ नारायणगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले त्यांनी विज्ञान शाखेत अध्ययन घेतल्यानंतर ते एमबीबीएसची पदवी घेण्यासाठी मुंबईत आले. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर असून वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहे. डॉ. कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात. त्यांच्या इतिहासाची माहिती घराघरात पोहोचावी, यासाठी त्यांनी आपले घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती देखील केली.

आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला तो कॅरेक्टर -

अभिनयातील उत्तम समज आवाजातील जरब आणि भेदक नजर या कलागुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे या व्यक्तिरेखा त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेले आहे. अनेक नाटके, मालिकांमधून चित्रपटातून त्यांनी आपले अभिनयाचे कौशल्य लोकांसमोर दाखवले. मात्र, अभिनयाच्या कारकिर्दीत राजा शिवछत्रपती या मालिकेत साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. खूप प्रसिद्धीदेखील मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील संभाजी राजांची भूमिकादेखील त्यांनी तितकीच समर्थपणे पेलली आणि लोकांच्या मनावर अधिराज्य केले.

अनेक चित्रपटात केले काम -

आमची शाखा कुठेही नाही, मंडळ आभारी आहे, सांगा उत्तर सांगा, वंडर्स ऑफ महाराष्ट्र कथा, बाई या कार्यक्रमांसाठी अमोल कोल्हे यांनी निवेदन केले होते. हे कार्यक्रम देखील प्रचंड लोकप्रिय झाले. त्याचबरोबर साहेब, रमा माधव, राजामाता जिजाऊ, रंगकर्मी, आघात यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले. त्याचबरोबर ऑन ड्युटी चोवीस तास या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका देखील साकारली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक -

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना स्टार प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे त्यांनी नेतृत्त्वदेखील केले आहे. त्यांच्या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. चांगले व्यक्तिमत्व, उच्चशिक्षण तसेच चांगले वक्तृत्त्व यामुळे तरुणाईला त्यांनी साद घातली. पक्षाला ज्येष्ठ नेत्यांनी रामराम करूनही 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 53 आमदार निवडून आले. या निवडीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सिंहाचा वाटा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details