दौंड -कोरोना या संसर्गजन्य व्हायरसने पुन्हा डोके वर काढले असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनामस्क फिरणाऱ्या १०० लोकांवर कारवाई करण्यात आली. तर नियमाचे उल्लंघन करणारे व्यवसाय आणि रस्ते नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० जणांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम
दौंड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर तसेच हॉटेल, व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर आस्थापनाच्या ५ केसेसमधून २५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
१८८नुसार सहा गुन्हे दाखल
नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणारे व्यवसायिक यांच्यावर कलम १८८नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये दौंड शहरातील सहा व्यवसायिकांवर कलम १८८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० लोकांवर दौंड पोलिसांनी कारवाई केली आणि ६५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.