पुणे (पिंपरी-चिंचवड) - येथील तरुणींची लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवरून फसवणूक करून करोडो रुपये उकळणाऱ्या चेन्नई येथील प्रेमराज थेवराज या तरुणाला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याने लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवरून उच्चशिक्षित तरुणींशी ओळख करत प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक तरुणींना फसवलं आहे.
माहिती देताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश - 100 पेक्षा अधिक तरुणींना फसवले -
आतापर्यंत चेन्नई येथील तरुणीसोबत विवाह करून तिची 98 लाखांची, ठाणे येथील तरुणीला विश्वासात घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून 45 लाखांची आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणीची 12 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे.
हेही वाचा -धक्कादायक.. पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या?
प्रेमराजकडून 7 मोबाईल, 13 वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड निगडी पोलिसांनी जप्त केले आहेत. प्रेमराज थेवराजला पुण्यात बोलावून विमानतळ परिसरात पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. यात, तक्रारदार तरुणीची मदत घेण्यात आली आहे. प्रेमराजने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक तरुणींना फसवलं असून, 60 पेक्षा अधिक तरुणी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या, असे निगडी पोलिसांनी सांगितले आहे.
एका लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवरून चार्टर्ड अकाउंटंट तरुणीची चेन्नई येथील प्रेमराजशी ओळख झाली. त्यांनी तीन महिने एकमेकांना प्रत्येक्षात न पाहता फोनवर संभाषण सुरू ठेवले. प्रेमराजने तरुणीचा विश्वास संपादन करून पैशांची गरज असल्याचे खोटं बोलून 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. तसेच तरुणीला चेन्नई येथे बोलवून लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या घेऊन लग्न झाल्याचं भासवलं. त्यानंतर लग्नाचे खोटे प्रमाणपत्र तरुणीला पाठवले.
दरम्यान, व्यवसाय करण्यासाठी 80 लाख रुपये कर्ज तुझ्या नावे काढून दे असे आरोपी म्हणाला, त्याला तरुणीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीला तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा, हा सर्व प्रकार बोगस असल्याचं समोर आले. या प्रकरणी 30 वर्षीय तरुणीने निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रेमराज थेवराज या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -दहिसरमध्ये आर्थिक कारणावरुन मुलानेच केली वडिलांची हत्या