पुणे - अकरावी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देऊन महिना झाला. मात्र, याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात येत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवारी) पुण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयावर अभाविपने आंदोलन केले.
पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत, राज्य सरकारचा निषेध केला. राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे. एमपीएससीसीच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय, शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या संदर्भात अजून कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.