पुणे -अखेर यंदाही पंढरीच्या विठोबाच्या पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वारीच्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
पंढरपुरच्या आषाढी पायी वारीला यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 वारकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. 10 मानाच्या पालख्यांना बसमधून परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुख्मिणीच्या मुखदर्शनाला 195 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यात आ पुण्यातील विधानभवन येथे आषाढी वारीबाबत चर्चा झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या वर्षीदेखील पायी वारीला परवानगी नसल्याचे सांगितले. याशिवाय पालखीसोबत कुठल्याही वारकऱ्याला चालत जाता येणार नाही. आळंदी आणि देहू येथून जाणाऱ्या प्रत्येक पालखीला दोन बस दिल्या जातील. एकूण 20 बसेसमधून पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जाईल असेदेखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.
- पालख्या वाखरी येथे पोहोचल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने पायी वारी घेऊन जाण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात परवानगी
- मागील वर्षी झाली त्याप्रमाणे या वर्षीदेखील शासकीय महापूजा होणार
- विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रत्येक पालखीसोबत पाच जणांना सोडण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. तर इतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाही
- पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे