पुणे - शहरातील गंजपेठ परिसरात असलेल्या एका भंगार गोडाऊनमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. शिवकांत कुमार (वय 28, रा. मूळ. उत्तरप्रदेश, सध्या, मासेआळी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शिवकुमार हा या भंगार दुकानात काम करत असे आणि रात्रीच्या वेळी दुकानातच झोपायचा. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गंज पेठ परिसरातील मासे आळी जवळ आरके स्क्रॅप सेंटर हे भंगार मालाचे दुकान आणि गोडाऊन आहे. मृत शिवकांत कुमार हा नेहमीप्रमाणे रात्री काम संपल्यानंतर गोडाऊनमध्ये झोपला होता. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री एका व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही नागरिक गंज पेठ परिसरात जमा झाले. त्यांनी पाहिले असता त्या ठिकाणी आग दिसली नाही. मात्र, थोड्यावेळाने दुकानाला आग लागल्याचे दिसून आले.