पुणे - कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरपरिस्थिती खूप भयंकर आहे. यामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतरण करून त्यांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीमधून अनेकजण पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील अभिजीत जाधव यांनी पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून एक दिवसाचे उत्पन्न त्यांना देण्याचे ठरवले असून आत्तापर्यंत त्यांच्याकडचे ८०० पेक्षा जास्त वडापाव विक्री झाले.
अभिजीतचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. थेरगाव परिसरात जाधव वडेवाले नावाने ते वडापावचा गाडा चालवतात. सध्याची पूरपरिस्थिती पाहता त्यांनी सांगलीतील वाळवा गावातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी वडापाव विक्री करून येणारे पैसे हे त्यांना देणार असल्याचे वडापावच्या गाडी शेजारी एक साउंड सिस्टीम लावून त्याद्वारे नागरिकांना मदतीचे आवाहन केले.