पुणे - पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आज पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली. नगरसेविका अर्चना पाटील यांनी याबाबत प्रस्ताव सदर केला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मान्यता दिली.
सिंहगडाच्या धर्तीवर पुरंदर येथे उभारण्यात येणार पुतळा
सिंहगडावर २०१७साली शूरवीर तानाजी मालुसरे यांचे भिंतीशिल्प बसविण्यात आले. या कामासाठी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमार्फत २५ लक्ष इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. याच धर्तीवर स्वराज्यप्राप्तीसाठी केलेल्या संघर्षमयी युद्धात आपले निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे यांचा भव्य असा पुतळा पुरंदर किल्ल्यावर उभारण्यासाठी स्थायी समितीमार्फत 1 कोटी इतकी तरतूद करणात आली आहे.
लवकरात लवकर पुतळा बसविण्यात येणार
महापालिकेच्यावतीने राज्य सरकार, केंद्र सरकार यांची लवकरात लवकर परवानगी घेण्यात येईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर बसविण्यात येईल, असेही यावेळी रासने यांनी सांगितले.