पुणे - तरटगाव येथील उजनी धरणाच्या माती भराव्याजवळ सात फुट लांबीची आणि सुमारे पावणेदोनशे किलो वजनाची मगर आढळली आहे. सतर्क ग्रामस्थ, पोलीस आणि मासेमारी करणाऱया युवकांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. गावापासून जवळच मगर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
इंदापूर तालुक्यातील तरटगाव गावापासून काही अंतरावर असणाऱ्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रापासून साधारणतः दोन किलोमीटर अंतरावर उजनी धरणाचा मातीचा भराव आहे. त्याच्या मुख्य द्वारापासून पाचशे मीटर अंतरावर आंदुबाई मंदिरासमोर सात वाजण्याच्या सुमारास उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी भारत साखरे यांना मगर आढळून आली. त्यांनी तरटगावचे पोलीस पाटील अनिल भांगे यांना ही माहिती कळवली. त्यानंतर भांगे यांनी उजनी धरण सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्क केले.