पुणे - मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील आत्महत्या काही थांबताना दिसत नाहीत. यातच सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावरील एका कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह सापडला. मृताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. अनिल बाबुराव खाटपे (वय 54) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पुण्यात रिक्षाचालकाची कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या, खिशातील चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण - पुण्यात रिक्षाचालकाची आत्महत्या बातमी
पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील एका कॅनॉलमध्ये एका रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला आहे. या मृताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे. अनिल बाबुराव खाटपे (वय 54)असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील कॅनॉलमध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात "कोरोना आजार होऊन हालहाल होऊन मरण्यापेक्षा मी आत्महत्या करत आहे" असा उल्लेख आहे. अनिल खाटपे हे धायरीतील गारमाळ परिसरात कुटुंबियांसह राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते. सिंहगड पोलिसात याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात मागील पाच दिवसात तब्बल 11 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना विषाणूशी सामना करत असताना अशााप्रकारे मोठ्या संख्येने आत्महत्या होणे धक्कादायक आहे.