पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील एका खासगी रुग्णालयात चक्क मुलगा झाल्याचे सांगून मुलगी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलाऐवजी मुलगी दिल्याचा आरोप प्रसूती झालेल्या महिलेच्या आईने केला आहे. दरम्यान, संबंधित रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले असून, रुग्णालयातील सर्वच नोंदवहीत प्रसूती झालेल्या महिलेला मुलगी झाल्याचे नमूद असल्याचे म्हटले आहे. तर, महानगर पालिकेच्या जन्म दाखल्यावर मुलगा असल्याचे नमूद आहे, असे महिलेच्या नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
११ ऑगस्टला रिटा अनिल जगधने यांची पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात प्रसुती झाली होती. डॉक्टरांनी रिटा यांना मुलगा झाल्याचे सांगितले. त्यामुळे, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. सर्वांनी एकमेकांना पेढे भरवले. रिटा यांच्या आई हिराबाई नवपुते यांना मुलाला पाहण्यासाठी आत बोलावण्यात आले. पण बाळाची प्रकृती बरी नसल्याचे सांगत हिराबाई यांना बाळ काचेत ठेवायचे आहे, असे सांगण्यात आले. यावेळी हिराबाई यांना डॉक्टरांनी देखील मुलगा झाला असल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर, डॉक्टरांनी हिराबाई यांचा अंगठा घेतला आणि त्यांना बाहेर थांबायला सांगितले. मुलाला काचेत ठेवावे लागेल असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यावर हिराबाई यांनी बाळ काचेत ठेवण्यास परवानगी दिली. त्यानंतर बाळाला चार दिवस काचेत ठेवण्यात आले होते. या दरम्यान नातेवाईकांकडून बाळ मुलगा आहे की मुलगी याबाबत प्रश्न करण्यात आला होता. त्यावर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी मुलगाच झाला असल्याची माहिती हिराबाई यांना दिली.