पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू हा दिवसेंदिवस आपली पायमुळं पसरवत असल्याचे दिसत आहे. या महामारीचा सर्वात जास्त धोका लहान मूल आणि वृद्ध व्यक्तींना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शहरातील एका अवघ्या १२ दिवसाच्या चिमुकल्याने आणि त्याच्या आईने कोरोनावर मात केली आहे. यासाठी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बाल आणि स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले जात आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनामुक्त महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी महिलेला ताप आणि खोकला येत होता. बाळ सोबत असल्याने त्याची देखील श्वास घेण्याची गती वाढली होती. म्हणून बाळ आणि आईला महानगर पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची कोरोना टेस्ट केली. तेव्हा, दोघेही पॉझिटिव्ह आढळले.