पुणे -भाच्याचा खून करणाऱ्या आरोपीचा मामाने खून केल्याची घटना पुण्यातील पर्वती पायथा परिसरात घडली. सौरभ वाघमारे (वय 17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -पुणे पालिकेतील क्लासवन महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना पकडले
एप्रिल महिन्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संग्राम लेकुवाळे या तरुणाचा खून झाला होता. सौरभ वाघमारे याने आणि अन्य काही अल्पवयीन आरोपींनी कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. या गुन्ह्यात सौरभ वाघमारे आणि त्याचे काही साथीदार बालसुधारगृहात होते. सौरभ वाघमारे हा नुकताच बालसुधार गृहातून सुटून आला होता. यापूर्वी खून झालेल्या संग्राम लेकुवळे याचा मामा असलेल्या वृषथ रेणुसे याने भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सौरभ वाघमारे याचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्याने इतर साथीदारांची मदत घेतली. रविवारी रात्री त्याने सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याच्या बहाण्याने पर्वती पायथ्याला बोलावून घेतले. सौरभ देखील एका मित्रासह त्या ठिकाणी आला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. सौरभ रक्ताच्या थारोळ्यात पर्वतीच्या पायथ्यावर पडल्यानंतर हे टोळके निघून गेले.