पुणे- आळंदीमधील सिद्धबेट परिसरातील एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ (वय 21 वर्षे, रा. सिद्धबेट, केळगाव मुळ रा. वंडागळी ता. सिन्नर जि.नाशिक) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आळंदीत सातत्याने अशा प्रकारच्या घटना उघड होत असल्याने वारकरी शिक्षणाचे धडे शिकण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई-वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. दरम्यान, पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे, असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचे त्या मुलाने आईला सांगितले.