पुणे- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे शिकारीच्या मागे धावणारा बिबट्या घरात शिरल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. हा बिबट्या घरात घुसल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली. अखेर वनविभाग आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या टीमने बिबट्याला बेशुद्ध करुन घराबाहेर काढले.
शिकारी मागे धावणारा बिबट्या शिरला घरात; पारनेरच्या पिंपळगाव रोठातील घटना - बिबट्याची सुखरुप सुटका
पिंपळगाव रोठा या गावात कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या दिलीप जगताप यांच्या घरात घुसला. यामुळे, घरातील महिला आणि मुलांची चांगलीच धावपळ झाली
पिंपळगाव रोठा या गावात कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या दिलीप जगताप यांच्या घरात घुसला. यामुळे, घरातील महिला आणि मुलांची चांगलीच धावपळ झाली. यानंतर दुसऱ्या दरवाजाने घरातील व्यक्तींना बाहेर काढून बिबट्याला आतमध्ये ठेऊन दार बंद करण्यात आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बिबट्या घरात घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम आणि माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र टीम घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला प्रथम बेशुद्ध करून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. दरम्यान, घरातील बिबट्या सुखरूपरित्या बाहेर काढल्यामुळे ग्रामस्थांनी दोन्ही टीमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.