पुणे - 'तुम पर काला जादू है' असे सांगून पुण्यातील एका महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शुभम शेतीया (21) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्तापर्यंत युट्युब आणि सोशल मीडियावर ज्योतिषशास्त्राची जाहिरात करून 30 ते 40 जणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुण्यातील कोंढवा परिसरातील एका महिलेने तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात सतत भांडणे सुरू होती. ही भांडणे कमी व्हावीत यासाठी तिने यूट्युबवर पाहिलेल्या एका जोतिषशास्त्राच्या जाहिरातीतील मोबाईलवर संपर्क साधला असता, समोरील व्यक्तीने ज्योतिषी मोहम्मद अली बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार महिलेने आपली अडचण सांगितली असता, त्याने 'तुम पर काला जादू है' असे सांगितले. यावर उपाय म्हणून होमहवन करावे लागेल, बळी द्यावा लागेल असे सांगून तक्रारदार महिलेकडून 1 लाख 6 हजार रुपये घेतले. परंतु यानंतरही आयुष्यात फरक पडला नाही आणि ज्योतिषी आणखी पैसे मागत होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसात तक्रार दिली.