पुणे - खाकी ड्रेस घालून रोहित्र चोरणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून ३ लाख ६० हजार रुपयांचे ४ रोहित्र हस्तगत करण्यात आले आहेत. वाकड पोलिसांकडे रोहित्र चोरीला गेल्याच्या २ तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार वाकड पोलीस अज्ञात चोरांचा शोध घेत होते. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी सुनील रघुनाथ कदम (४८), जबिर अब्दुल शेख (३२), हनुमंत सूर्यकांत माने (४३) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आपण रोहित्र चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आनंदवन सोसायटी थेरगाव आणि ज्ञानदा कॉलनी वाकड येथून ३ लाख ६० हजार रुपयांचे रोहित्र अज्ञात चोरांनी लंपास केले होते. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात २ वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आल्या होत्या. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले, तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याकरता ३ पथकं तयार करण्यात आली. दरम्यान, बातमीदारामार्फत एक व्यक्ती खाकी कपडे घालून अन्य एका व्यक्तीसह रोहित्र घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा तपास केला असता ३ आरोपी मिळाले, त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुलीही पोलिसांना दिली.