महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढणारी टोळी जेरबंद - पुणे सायबर लेटेस्ट क्राईम न्यूज

एटीएमकार्ड क्लोन करून पैसे चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील नागरिकांचे पैसे दुसऱ्या जिल्ह्यातील एटीएममधून काढल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात पोलिसांच्या निदर्शनास आल्या होत्या.

Pune Crime
पुणे क्राईम

By

Published : Dec 11, 2020, 10:43 AM IST

पुणे - अनेक नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे अन्य जिल्ह्यांच्या एटीएम सेंटरमधून काढले जात असल्याचा अनेक घटना पुणे शहरात समोर आल्या आहेत. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारीही आल्या होत्या. पोलिसांनी याचा तपास करत एटीएम कार्ड क्लोन करून बनावट एटीएम कार्डद्वारे पैसे काढणारी आंतरजिल्हा टोळीला नाशिक येथून जेरबंद केले आहे. पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांनी याबाबत माहिती दिली.

एटीएम कार्ड क्लोन करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे

दोन आरोपींकडून जप्त केला मुद्देमाल -

याप्रकरणी मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय 37), मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय 37, रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून 359 बनावट एटीएम कार्ड, 13 एटीएम स्कीमर डिव्हाईस, 12 डिजिटल मायक्रो कॅमेरे, दोन वॉकिटॉकी, चार्जर, हेडफोन, 15 मायक्रो बॅटरी आणि त्याचे मॅकॅनिझम, 50 डेटा केबल, चार लॅपटॉप चार्जर, , 11 सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, 11 स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, चार इलेक्ट्रॉनिक सर्किट, 9 सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्याकरिता लागणारा कलर प्रिंटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडे डेनिस मायकल (32,रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींना नाशिकमधून अटक -

मायकल यांच्या खात्यातून 30 नोव्हेंबरला नाशिक येथील एटीएम सेंटरवरून 10 ट्रानझॅक्शन करून एक लाख रुपये काढण्यात आले होते. याबाबत सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अशा प्रकारचे 200 ते 225 गुन्हे पोलिसांकडे आल्याने त्याबाबत तक्रारींचे विश्लेषण करून त्यांनी आरोपींचा माग काढला. आरोपी नाशिक येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांचे पथक नाशिकला गेले आणि आरोपींना ताब्यात घेतले.

चोरीच्या पैशावर दोन वर्षे आरोपी दुबईत -

आरोपी मोहम्मद फैजन फारुख छत्रीवाला याने त्याच्या इतर साथीदारांसोबत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तो मागील तीन वर्षापासून फरार होता. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे दोन वर्षे दुबईमध्ये पळून गेला. डिसेंबर 2019 मध्ये तो भारतात परतला आणि त्याने पुन्हा सायबर गुन्हे सुरू केले. इलेक्ट्रॉनिक डिप्लोमापर्यंत त्याचे शिक्षण झाले असून दुसरा आरोपी अल्पशिक्षित आहे, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिली.

नायजेरियन आरोपी गजाआड -

पुण्यातील हडपसर भागात सातवनगर येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मध्ये स्कीमर आणि पिन होल कॅमेरा लावून ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती आणि पिन क्रमांक चोरी करण्याचा प्रयत्न एका आरोपीने बुधवारी सायंकाळी केला. बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. बॅंकेने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला. लुक्कास विल्यम (वय-31, रा. हंडेवाडी, पुणे, मु.रा. नायजेरिया) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल, एटीएम कार्ड माउंट, पिन कॅमेरा, बनावट डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पाच ते सहा एटीएम मध्ये त्याने स्कीमर लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल राहिला. मागील सहा वर्षापासून तो भारतात बेकायदेशीर पध्दतीने राहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details