पुणे - राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यासह पुण्यातही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरोरोज 4 ते 5 हजार कोरोनाबाधितांची भर पडत आहे. सर्व सरकारी दवाखाने आणि खासगी दवाखाने देखील वाढत्या रूग्णसंख्येमुळे गजबजली आहेत. आरोग्य विभागाला मदत म्हणून विविध संस्था आणि सामाजिक संघटनांच्यावतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचात 100 ऑक्सिजन बेडचे कोरोना रूग्णालय सुरू केले जात आहे. येत्या एक ते दोन दिवसात हे रूग्णालय पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचात 100 ऑक्सिजन बेडचे कोरोना रूग्णालय तयार होत आहे अनेकांनी दिला मदतीचा हात -
शहरात महानगरपालिकेची रूग्णालये, जम्बो कोविड सेंटर आणि खासगी रूग्णालयांची ताब्यात घेतलेली 80 टक्के बेड्स रूग्णांनी व्यापली आहेत. त्यामुळे रूग्णांची मोठ्या प्रमाणात वणवण सुरू आहे. अशा परिस्थितीमुळे शहरातील काही देणगीदार आणि नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नाने गणेश कला क्रीडा मंचाच्या येथे 100 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. या ठिकाणी ऑक्सिजनचा स्वतंत्र प्लँट बसवला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या रूग्णालयात ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, अशी माहिती नगरसेवक आबा बागुल यांनी दिली.
प्रत्येक लोकप्रतिनिधीने काहीतरी केले पाहिजे -
कोरोनाच्या या महासंकटात लोकांना मदतीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. सध्या वैद्यकीय स्वरूपातील मदत खूप महत्त्वाची ठरत आहे. पुणे शहरात 1 खासदार, 8 आमदार आणि 150 हून अधिक नगरसेवक आहेत. प्रत्येकाने जर आपापल्या भागात छोट्या पद्धतीचे 30 ते 50 बेडचे रूग्णालय सुरू केले तर पुण्यातील रूग्णांचे हाल होणार नाहीत, असे मत नगरसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केले.
मनसे शहराध्यक्षाने हॉटेलमध्ये सुरू केले कोविड सेंटर -
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात बेड्सची कमतरता भासत आहे. यामुळे पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यावतीने एका हॉटेलचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. यात 40 ऑक्सिजन व 40 क्वारंन्टाईन बेडची सोय करण्यात आली आहे.
सामाजिक संस्थांची मोफत कोविड केअर सेंटर -
वाढत्या कोरोना रूग्णसंख्येचा शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषध सुविधा मिळण्यासाठी तासन तास वाट पाहत बसावे लागत आहे. ही परिस्थिती पाहून शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून काही ठिकाणी मोफत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.