पुणे- शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यात आल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील ६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज विभागात ५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून विभागातील एकूण रुग्ण संख्या ३८८ एवढी आहे. त्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही २८५ एवढी आहे. मृत्यू झालेले तिनही जण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक असून ते ससून रुग्णालयात भर्ती होते. यात मृत्यू झालेल्या तिनही रुग्णांमधील एका २७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया होता. ५० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णास न्यूमोनिया, उच्च रक्तदाब हे विकार होते. त्याचबरोबर, ७७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला न्यूमोनिया, उच्च रक्तदाब व थायरॉईडचा विकार होता.