पुणे - एका लेफ्टनंट कर्नल महिलेने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी लष्करातील एका ब्रिगेडियर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ब्रिगेडियरने या महिलेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्येसंदर्भातील घटना 13 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. सुपीरियर ऑफिसर ब्रिगेडियर अजित मीलु (रा. ब्रिगेडियर जनरल स्टाफ हेडक्वार्टर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, शिमला, हिमाचल प्रदेश) असे त्याचे नाव आहे. वानवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी -
याप्रकरणी आत्महत्या केलेल्या अधिकारी महिलेच्या 43 वर्षीय पतीने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. प्राप्त माहितीनुसार, 42 वर्ष लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केली होती. त्यांना सतरा वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे वडील निवृत्त कर्नल आहेत. मागील काही वर्षापासून आत्महत्या केलेल्या महिलेचे आपल्या पतीबरोबर कौटुंबिक वाद सुरू होते. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी ब्रिगेडियर यांनी आत्महत्या केलेल्या महिलेसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. हे असले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनाम करण्याची धमकी ब्रिगेडिअर यांनी लेफ्टनंट कर्नल महिलेला दिली होती. या धमकीला घाबरुन लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केल्याची माहिती महिलेच्या पतीने पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा -नाशकात विष घेऊन तरुणाची आत्महत्या
आत्महत्या करण्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल महिलेने मोबाईल समोर ठेवला होता या मोबाईलची तपासणी अद्याप सुरू आहे महिला लेफ्टनंट कर्नल या पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. त्यामध्ये तीन महिन्याचा प्रशिक्षण काळ त्यांनी पूर्ण केला होता. त्यांना राहण्यासाठी ऑफिसर्स मेसमधील वन बीएचके फ्लॅट देण्यात आला होता. तेथेच त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.