लोणावळा शहरात मध्यरात्री 81 मिलिमीटर पावसाची नोंद - lonavala rain news
लोणावळा शहर व परिसरात मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सुमारे 81 मिमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 1 हजार 590 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हे गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.
लोणावळा (पुणे) - लोणावळा शहर व परिसरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत लोणावळा परिसरात एकूण 1 हजार 590 मिलिमीटर पाऊस झाला असून काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, मध्यरात्री जोरदार झालेल्या पावसाची नोंद 81 मिलिमीटर इतकी आहे.
लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. सर्वाधिक पर्यटक हे जास्त पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये पर्यटनासाठी येत असतात. पण, यावर्षी कोरोनामुळे पर्यटकांना बंदी आहे. त्यात यावर्षी पाऊस देखील कमी प्रमाणात पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दडी मारलेल्या पावसाने मध्यरात्री लोणावळा शहरात चांगलाच बरसला आहे.
आज (दि. 4 ऑगस्ट) सकाळी मात्र पावसाने उघडीप दिली आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. लोणावळा परिसरात आत्तापर्यंत 1 हजार 590 मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात तब्बल 4 हजार 610 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी वरुणराजाची अवकृपा दिसत असून अधूनमधून पाऊस दडी मारत आहे. यामुळे भातशेती करणारे शेतकरी चिंतेत आहेत.