पुणे - पिंपरी-चिंचवड पालिकेचे ८०० कोटी येस बँकेत असल्याचं समोर आले असून सध्या या बँकेवर आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिका आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पैसे सुरक्षित असल्याचे सांगितले असून याचा परिणाम हा पालिकेवर झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लागू केल्याने अनेकजण अडचणीत आले आहेत. मध्यरात्रीपासून नागरिकांनी एटीएममध्ये रांगा लावलेल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग हा झालेला दिसत नाही. कारण, सर्वसामान्य नागरिकांना शैक्षणिक आणि लग्न सोहळ्यालाच आरबीआयची परवानगी घेऊन ५० हजार रुपये काढता येणार आहेत. मात्र, इतर क्षेत्रातील नागरिकांना आणि खातेदारांना पैसे काढता येणार नाहीत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ८०० कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत २०१७ पासून ठेवल्या आहेत. त्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली होती. आकर्षक व्याजदरामुळे ही ठेवी ठेवल्या असल्याचेही सांगण्यात येत आहे. महानगरपालिकेला विविध करापोटी दररोज कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते, ते विविध बँकांमध्ये जमा केले जाते. येस बँकेतील रक्कम ही वेतन आणि विकासकामांसाठी खर्च केला जातो. केंद्रातून मिळालेला निधीदेखील या बँकेत ठेवी स्वरूपात ठेवला जातो. त्यावर आठ टक्के पेक्षा अधिक आकर्षक व्याज दर मिळते.