पुणे -जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुळणी या संयुक्त ग्रामपंचायतीचा गाडा आता ८० वर्षीय महिलेच्या हाती सोपवण्यात आला आहे. गावात पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक पार पडली. त्याद्वारे संपूर्ण गावाने आजीवर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले आणि इंदुबाई ढेरंगे अंगठेबहाद्दर या आजी सरपंच झाल्या आहेत.
स्पेशल रिपोर्ट
एका सर्वसामान्य कुटुंबातील आणि ८० वर्षाच्या महिलेचा विजय म्हणजे केवळ गावच्या सरपंचपदाची निवडणुकीतला विजय नाहीतर अशिक्षित असूनही शिकलेल्या लोकांना शिकवणारा विजय आहे. संपूर्ण गुळाणीला ढेरंगे आजीचा अभिमान आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निवडणूक लढवणे आणि ती जिंकणे ही सोपी गोष्ट नाही आहे. मात्र, एका आजीने विरोधकांना चितपट करत आजीच्या विजयाने गावचा विश्वास वाढवला आहे.
अंगठेबहाद्दर असल्या तरी त्यांनी गावाचा विकासाचा ध्यास बांधला. इंदुबाईंनी सरपंचपदाच्या खुर्चीवर बसून एक इतिहास रचला आहे. त्यामुळे आजवर घराला घरपण देणारी आजीबाई आता गावाला गावपण द्यायला तयारीला लागली आहे.
८० व्या वर्षी स्वत:चा जीव सांभाळताना जीव जातो. मात्र, इंदुबाईंनी संपूर्ण गावालाच सांभाळण्याची मोठी जबाबदारी घेतली आहे. राजकारण म्हणजे तरुणांचे आणि पैसेवाल्यांचे काम अशा नकारात्मक मानसिकतेत जगणाऱ्यांना आजीबाईंनी जोरदार चपराक लावली आहे. इंदुबाईंनी गावच्या विकासाचा निर्धार केला आहे. त्यामुळे गावच्या तरुणांमध्ये वेगळा उत्साह आहे.
सासुबाईंच्या विजयामुळे सुनेने चक्क सासुबाईंनाच उचलून घेतले. आपल्या सासुबाईंनी मोठ्या कष्टातून हे विश्व उभारले असल्याचे त्यांच्या सुनबाई म्हणाल्या. गावच्या विकासासाठी आजीची धडपड नव्या पिढीला लाजवेल अशीच आहे. गावानी आजीच्या हातात कारभार सोपवला. मात्र, ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल माहिती नसणाऱ्या आजी कारभार कसा चालवणार? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.