पुणे - पुण्यात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली असून आणखी तीन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुण्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या एकूण ८ झाली आहे. तर, मुंबईतले 2, नागपुरातील एक असे मिळून राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ वर गेली आहे.
पुण्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. पुण्यात दुबईत जाऊन आलेले कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी, त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी आणि सध्या पुण्यात असलेला एक अशा तिघांची तपासणी करण्यात आली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याव्यतिरिक्त दुबईला ट्रीपला गेलेल्यांपैकी ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ८ वर गेलीआहे. या रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.