पुणे - आस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा बेजार झाला आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच एका पंचाहत्तरी पार केलेल्या आजीबाईंनी आधुनिक शेतीचा आदर्श सगळ्यांपुढे ठेवला आहे. त्यांनी 'पांढरी शतावरी' या पिकाची लागवड करुन एकरी तब्बल ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगावात असणाऱ्या नाळेवस्ती येथील ७५ वर्षांच्या सखुबाई गायकवाड यांनी आधुनिक शेतीचा आदर्श घालून दिला आहे. एका औषध कंपनीने या पिकाबद्दल दिलेल्या माहितीला महत्त्व देत, आजींनी 'पांढरी शतावरी' पीकाची लागवड करुन एकरी चक्क 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. आजीबाईंनी केलेल्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
75 वर्षाच्या आजीबाईंनी एकरात घेतले ७ लाखांचे उत्पन्न ७५ वर्षीय आजी सखुबाई गायकवाड यांनी पांरपारिक शेती करत असतानाच आपल्या 6 एकर ऊसातील 1 एकर ऊस मोडून आयुर्वेदात विशेष असे महत्व असणाऱ्या शतावरी या पिकाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या पीक लागवडीपासून काढणीपर्यंत दीड लाख रुपये खर्च केला. या पीकासाठी कष्ट आणि चिकाटीने मेहनत करुन एखादया तरुण शेतकऱ्याला लाजवेल असे विक्रमी पीक घेऊन चक्क सात लाख रुपयांचे उत्पन्न काढले.
मागील वीस ते पंचवीस वर्षापासून ऊसासह सोयाबीन, मका अशीच पिके घेणाऱ्या आजीबाईंनी एक नवा प्रयोग केला. आजीबाईंनी खचून न जाता, आपली सगळी ताकद या पिकासाठी लावली. अवघ्या अठरा महिन्यातच आजींचा हा प्रयोग यशस्वी झाला. ज्या सहा एकरामध्ये आजीबाईं गेले वीस ते पंचवीस वर्ष पारंपरिक शेती करत होत्या. त्याला आता शतावरी ही उजवी ठरली आहे.अवघ्या अठरा महिन्यात जवळ पास सहा ते सात लाख रुपये उत्पन्न आजींना मिळाले आहे. या यशाची चर्चा आता सर्वच ठिकाणी होत आहे.