पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या हजाराचा टप्पा गाठत होती. परंतु, गेल्या 3 दिवसांपासून ही आकडेवारी आटोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काल दिवसभरात 748 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 727 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 हजार 682 वर पोहोचली असून सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. दिवसभरात 748 कोरोनाबाधित आढळले असून 727 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, आतापर्यंत 16 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, मृत्यूच्या आकड्याने पाचशे पर्यंत मजल मारली आहे. मृत्यूचा वाढता दर कमी करण्याचे डॉक्टरांपुढे आव्हान आहे.