पुणे - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 7 बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2 बालकांची अतिजोखमीच्या आजारातून सुटका करण्यात बालरोग विभागाच्या डाॅक्टरांच्या पथकाला यश आले आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील २ ते १२ वर्षे वयोगटातील ७ बालकांनी कोरोनावर मात केली आहे. आज (२ मे) यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले.
पिंपरी चिंचवडमध्ये ७ बालकांनी केली कोरोनावर मात - coroana news
पिंपरी चिंचवडमध्ये 7 बालकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज (२ मे) यशवंतराव चव्हाण रूग्णालयातून या बालकांना सुखरूप घरी सोडण्यात आले.
ही ७ कोरोनाग्रस्त बालके १६ व १७ एप्रिलला बालरोग विभागात दाखल झाली होती. त्यामध्ये रूपीनगर निगडीमधील ५ बालकांचा व भोसरीतील २ बालकांचा समावेश होता. या बालकांना वेळोवेळी सर्व उपचार देवून १४ दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले. यापैकी 2 बालकांवर कोरोनाचे उपचार चालू असताना त्यांच्या प्लेटलेट्सचे प्रमाण ३०,००० व ६६००० असे प्रयोगशाळेतील अहवालानुसार झाले होते. सशक्त बालकांमध्ये हे प्रमाण १,५०,००० च्या वर असते. त्यासाठी या बालकांवर उपचार करून 7 दिवसात त्यांच्या प्लेटलेटस (पांढऱ्या पेशी) पूर्ववत करण्यात यश मिळाले. त्यांना बालरोग अतिदक्षता विभागात त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले होते. माता व बालकांच्या १४ दिवसांच्या उपचारानंतर दोन वेळा घशातील द्रवाची तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे आज (२ मे) त्यांना घरी सोडण्यात आले.
बालरोग विभागातील डाॅक्टर्स व कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर,अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे व वैद्यकिय अधिक्षक डाॅ अनिकेत लाठी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने ही कामगिरी करता आली. बालरोग विभाग प्रमुख डाॅ. दिपाली अंबिके, डाॅ. सुर्यकांत मुंडलोड सर्व निवासी डाॅक्टर्स, स्टाफ व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे या बालकांनी रोगावर मात केली.