पुणे - शहरात तलवारी आणि कोयते नाचवत 'मुळशी पॅटर्न' चा थरार चित्रपटाच्या माध्यमातून रंगला. मात्र, आता 'मुळशी पॅटर्न' च्या आधारावर देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' सुरू झाल्याचे पहावयास येत आहे. तलवारी, कोयत्यांचा वापर करून टिकटॉकच्या माध्यमातून सध्याची अल्पवयीन मुले व्हिडिओ तयार करत आहे. या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
'मुळशी पॅटर्न' चित्रपटात काय आहे?
मुळशी पॅटर्न चित्रपटात जे घडले तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. 'तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या; म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?' हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्याच डायलॉगचा वापर करणारे हे अल्पवयीन तरुण देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत आहेत. आधी आयटी पार्क, इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली. एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला. नंतर त्याचाही कसा अंत झाला हे मुळशी पॅटर्नमध्ये दाखवले आहे. याचे चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झाले आहे.
याचाच आधार घेऊन 'आळंदी पॅटर्न' मध्ये आळंदीमधील बाजारपेठ, इंद्रायणी घाट आणि अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला. 55 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी नगरीत वारकरी घडवले जातात. मात्र, आता याच वारकऱ्यांच्या आळंदीत "टिक टॉक" च्या माध्यमातून तरुणाई गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करताना दिसते आहे. एकंदरीत यातून सूडाची भावना निर्माण करणारे व्हिडिओ "टिक टॉक" च्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले आहे. पोलिसांनी 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत असणाऱ्या 6 तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील तिघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
हेही वाचा -'मनात आणलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार नवीन वर्षापूर्वी'