महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सापळा रचून 6 जण पकडले - पुणे डिझेल चोरीची घटना

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी 6 आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

pun3e
pune

By

Published : Jun 14, 2021, 4:24 PM IST

दौंड (पुणे) -दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 6 आरोपी पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

डिझेल चोरीच्या 2 घटना

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जून २०२१ रोजी मध्यरात्री नांदूर येथील एका कंपनीसमोर पार्किंग मधिल ५ ट्रकमधून सुमारे ८३ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच ११ जून २०२१ रोजी पारगाव येथील एका ट्रकमधून २५ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. या दोन्ही डिझेल चोरीच्या घटनाबाबत गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.

सापळा रचून 6 जणांना पकडले

त्यानुसार, या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका विशिष्ट पथकाने तपास सुरू केला. या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत उरुळी कांचन परिसरातील काही संशयितांची नावे मिळाली. या माहितीची खात्री करून उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि 6 जणांना ताब्यात घेतले. दत्ता विनोद रणधीर (२२ वर्षे), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (२७ वर्षे), वैभव राजाराम तरंगे (१९ वर्षे), प्रतीक बन्सीलाल तांबे (२६ वर्षे), स्वरूप विजय रायकर (२३ वर्षे) आणि धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (३४ वर्षे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

चोरीची दिली कबुली

हे आरोपी मारुती सुझुकी कंपनीची एक अल्टो कार, इर्टीगा कार घेऊन रात्री बाहेर पडून डिझेल चोरी करत होते. त्यांनी डिझेल चोरी केल्याचे कबुलही केले आहे. यादरम्यान, त्यांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाइलदेखील चोरल्याचे सांगितले आहे.

४ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून ८० हजार रुपयांची अल्टो, 4 लाख रुपयांची इर्टीगा, 10 हजार रुपयांचा चोरलेला सॅमसंग j2 मोबाइल, असा जवळपास एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा -मुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय?; गँगस्टर फहिमच्या नावाने व्यावसायिकाला धमकीचे फोन

ABOUT THE AUTHOR

...view details