पुणे- विद्युत वाहिनीची तार तुटून मेंढ्याच्या कळपावर पडल्याने 55 मेंढ्या ठार झाल्याने खळबळ उडाली. ही घटना खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडी येथील आवटे मळ्यात रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने मेंढपाळ कुटुंब यातून थोडक्यात बचावले.
धक्कादायक; मेंढ्यांच्या कळपावर विद्युत वाहिनीची तार पडल्याने 55 मेंढ्या ठार - कळप
वादळी पावसामुळे विद्युत वाहिनीची तार तुटून मेढ्यांच्या कळपावर पडली. यामुळे ५५ मेंढ्या ठार झाल्याने मेंढपाळाचे नुकसान झाले.
कडूस परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळामुळे टोकेवाडी येथील आवटे मळ्यात विद्युत वाहिनीची तार तुटून शेतातील मेंढ्यांच्या कळपावर पडली. यात विजेच्या धक्क्यामुळे शिवाजी नाथा तिखोळे व बाळू नाथा तिखोळे (रा. ढवळपुरी, जि. नगर ) या मेंढपाळ भावांच्या 55 मेंढ्या जागेवरच मरण पावल्या.
घटनास्थळी मृत मेंढ्यांचा अक्षरशः ढीग लागलेला आहे. तार तुटलेली विद्युत वाहिनी सायगाव-कडूस दरम्यान भिमानदीच्या बाजूकडे आहे. घटनेवेळी दहा ते पंधरा माणसांचे तिखोळे कुटुंब तुटलेल्या तारेपासून थोडे दूर अंतरावर होते, त्यामुळे हे कुटुंब अपघातातून थोडक्यात बचावले. मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन पाणी व चारा शोधत रोज एका गावात आपला संसार उघड्यावर शेतात मांडतात.