पुणे : भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात मान्सूनचे आगमन साधारणत: 7 जूनच्या दरम्यान होते. मात्र यंदा कोकणात 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जूनमध्ये सरासरी 207.6 मिमी पर्जन्यमान आहे. तर जून अखेरीस 110.9 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. म्हणजेच जून महिन्याच्या सरासरीच्या 53.4 टक्के पाऊस हा यंदा पडला आहे. तसेच राज्यात 5.25 लाख हेक्टर पिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी :गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली असून जूनमध्ये कोकणात सर्वाधिक पाऊस झाला आहे. नाशिक विभागात म्हणजेच नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागात हलका पाऊस झाला. चालू वर्षात ५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये 32 टक्के पाऊस झाला होता, मात्र यंदा 53 टक्के पाऊस झाला आहे. ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट असल्याचे सुनिल चव्हाण म्हणाले.
जूनच्या अखेरीस चांगला पाऊस :गेल्या आठवड्यात कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन केले होते. मात्र आता जूनच्या अखेरीस चांगला पाऊस झाला असून ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे. गेल्या वर्षी जूनअखेर राज्यात १६.९२ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. यंदा ५.२५ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये 31 टक्के पेरणी झाली होती तर, यंदा 3.70 टक्के पेरणी झाल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली.