पुणे- माळीण हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील एक छोटसं गाव. भीमाशंकर पासून २० कि.मी आणि पुण्यापासून ७५ किमी अंतरावर हे गाव आहे. डोंगरदऱ्यांमध्ये दुर्गम भागात वसलेल्या या गावाला शहरीकरण आणि विकासाचा मागमूसही नाही. ३० जुलै २०१४ ला पहाटे साखर झोपेत असताना गावाववर काळाने घाला घातला. संपूर्ण माळीण गावावर दरड कोसळली. दरड कसली ती? डोंगरच कोसळला म्हणा ना. अचानक चिखल, माती, दगडे आणि झाडे डोगंरावरुन खाली कोसळत आली. या मलब्याने माळीण गावाला उद्ध्वस्त केले.
गावातील ७५ पैकी ४४ घरे मलब्याखाली दबले गेले. १५० ते १६५ स्त्रिया आणि पुरुष, लहान मुले, गाई म्हशीही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. लोकांना काही समजायच्या आत होत्याचे नव्हते झाले. लोकांना घराबाहेर पडायलाही संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी आहुपे मंचर या एसटी ड्रायवरला माळीण गाव मलब्याखाली गडप झाल्याचे समजले. त्यानंतर प्रशासनाला या आपत्तीची माहिती मिळाली. तोपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा नसल्याने कोणालाही या दुर्घटनेची माहिती नव्हती.
पश्चिम घाटाचा भाग असल्याने पावसाळ्यात या भागात जोरदार पाऊस पडतो. रस्तेही वळणावणाचे असून अरुंद आहेत. अशात पुण्याहून एनडीआरएफ पथक डॉक्टर नर्सेससह माळीणला दाखल झाले. प्रशासन यंत्रणा जागी झाली. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस सर्वांनी माळीणकडे धाव घेतेली. बचाव आणि मदत कार्य सुरु झाले.
चिखल माती, दगड याच्या मलब्याखाली किती जण अडकले याची निटशी माहितीही बचाव पथकाला नव्हती. जखमींचा अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. चिखल पाण्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. सुरुवातीला काही जणांना वाचवण्यात यश आले. आणखी ५० ते ६० मृतदेह मातीखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, बचावकार्याच्या ६ व्या दिवशी १०० पेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य समजायला लागले. मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांनीही माळीण गावाला भेट दिली. जिल्हाधिकारी आणि राज्यातील इतर विभागाचे अधिकारी जातीने हजर राहून मदतकार्याचा आढावा घेत होते. या घटनेत दिडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण बेपत्ता झाले.
दरड कोसळण्याच्या घटना महाराष्ट्रात यापूर्वीही झाल्या आहेत. अॅण्टाप हिल, मुंबई येथे ११ जुलै, २००५ रोजी दरडीखाली ५ ठार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ५ गावांमध्ये डोंगरकडा कोसळून २५ जुलै, २००५ रोजी १९४ ठार तर ५ सप्टेंबर २००९ रोजी मुंबईतील साकीनाका येथे दरड कोसळून १२ ठार. तरीसुध्दा क्षणार्धात दरड कोसळून गाव मातीखाली गायब होण्याची माळीण दुर्घटना राज्यात पहिलीच होती.
या घटनेनंतर माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा ओघ सुरु केला. गावातील वाचलेल्या लोकांना, जखमींना आर्थिक मदत देण्यात आली. संपूर्ण माळीण गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावाजवळच योग्य जागा पाहून संपूर्ण गाव नव्यानं वसवण्यात आलं. प्रत्येक पीडित कुटुंबाला घर बांधून दिले. परंतु, फक्त घरे बांधून दिल्याने गावकऱ्यांचे प्रश्न सुटणारे नाहीत. दरड कोसळल्यामुळे गावाचे झालेले नुकसान कधीही भरुन निघणारे नाही.
या घटनेनंतर राज्य प्रशासन खडबडून जागे झाले. भारतीय भूवैज्ञानिक पथकाने माळीण गावाची पाहणी केली. दरड कोसळण्यास कारणीभूत असलेल्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. माळीण दुर्घटनेमागे नैसर्गिक कारणे मुख्यत्वे जबाबदार असल्याचा निष्कर्ष भूवैज्ञानिक पथकाने काढला. राज्याच्या पश्चिम घाट क्षेत्रामध्ये असणाऱ्या जिल्ह्यातील डोंगरांचा अभ्यास करण्यात आला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर हे डोंगरदऱ्या असणारे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांना दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य आपत्ती निवारण पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरड प्रवण क्षेत्रे, डोंगराखाली राहणारी गावे, त्यांना असणारा धोका याचा आढावा घेण्यात आला. वन विभागाकडूनही राज्यातील १५ टक्के दरड प्रवण क्षेत्राचा अभ्यास करण्यात आला. दरड कोसळण्यामागे जसे नैसर्गिक कारणे आहेत, तसेच मानवनिर्मित कारणेही आहेत. डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण करणे, डोंगर फोडणे, अनियंत्रित बांधकाम, वृक्षतोड कारणीभूत आहेत.
निसर्गनिर्मित कारणांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी मानवी हस्तक्षेप नक्कीच कमी करु शकतो. मात्र, प्रशासकीय पातळीवर अनास्था दिसून येते. वन कायदे, सीआरझेड नियमावली, पर्यावरण विषयक कायदे सर्रास पायदळी तुडवली जातात. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी नागरिक, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. नाहीतर आणखी माळीण सारख्या घटना होतच राहतील.