खेड ( पुणे ) - भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीला, पुणे जिल्ह्यातील ४८ गावांनी पहिल्या आणि दुस-या लाटेत देखील आपल्या गावात शिरकाव करू दिला नाही. या गावांमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. यातील बहुतेक सर्व गावे दुर्गम भागातील आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ४४२ ग्रामपंचायती आज अखेर कोरोना मुक्त झाल्या आहेत.
४८ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच
राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात ९ मार्च २०२० रोजी सापडला, आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर एक महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागातून ग्रामीण भागात ही पसरला. त्यानंतर पहिल्या लाटेत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात, संपूर्ण ग्रामीण भागात कोरोना महामारीची लागण झाली. तर कोरोनाच्या दुस-या लाटेत तर हजारो गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली. पहिल्या आणि दुसर्या लाटेमध्ये मिळून, पुणेजिल्ह्यातील १३५५ ग्रामपंचायतींमध्ये कोरोनाची बाधा झाली. तरी देखील ४८ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोना ची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावे देखील कोरोना मुक्त व्हायला सुरुवात झाली आहे.