महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime News : खेळ पैशांचा! चिंचवड मतदारसंघात 43 लाख तर कसबामध्ये 5 लाखांची रोकड जप्त; 'हे' पैसे मतदारांना वाटपासाठी? - cash seized in Kasba in Pune

पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन्ही मतदार संघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशातच निवडणूक आयोगाकडून चिंचवड मतदार संघात 43 लाख तर कसबा मतदार संघात 5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Cash Seized In Chinchwad And Kasba
रक्कम जप्त

By

Published : Feb 20, 2023, 7:13 PM IST

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीविषयी बोलताना अधिकारी

पुणे:भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ या विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. याअनुषंगाने तयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शश्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.


मुद्देमाल आणि अंमली पदार्थ जप्त: आज अखेर पर्यंत २०५ चिंचवड मतदार संघात ४३ लाख रोकड, ७३३६.१६ लिटर मद्य (किंमत ४,९७,६२५/-) तसेच, ३.५८४ ग्रॅम गांजा (किंमत ९४७५०/-) जप्त करण्यात आला आहे. तसेच, २१५- कसबापेठ मतदार संघात ५०३५००/- रोकड, ३१३.१८० लिटर मद्य (किंमत २०,६५०/-) तसेच, २५ ग्रॅम एमडी ( किंमत ५ लाख) जप्त करण्यात आला आहे.


२६ फेब्रुवारी रोजी मतदान: पुणे जिल्हयातील २०५ चिंचवड व २१५ कसबापेठ या विधानसभा मतदार संघातील विधानसभा सदस्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार या दोन विधानसभा मतदार संघामध्ये २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी प्रकिया पार पाडण्यात येणार आहे.


अशी आहे मतदारांची आकडेवारी: २०५ - चिंचवड व २१५ कसबापेठ मतदार संघाच्या पोट निवडणूकीच्या संचालनासाठी मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीनुसार २०५ चिंचवड मतदार संघामध्ये एकुण मतदारांची संख्या ५,६८,९५४ इतकी आहे. त्यापैकी ३,०२,९४६ पुरुष, २,६५,९७४ स्त्री व ३४ तृतीय पंथी मतदार आहेत. या एकूण मतदारांमध्ये १२३१३ दिव्यांग मतदार आणि ८० वर्षांवरील १९२६ मतदार समाविष्ट आहेत. तसेच, ३३१ अनिवासी भारतीय, १६८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत. २१५- कसबापेठ मतदार संघामध्ये एकूण मतदारांची संख्या २,७५,६७९ इतकी आहे. त्यापैकी १,३६,९८४ पुरुष, १३८.६९० स्त्री व ५ तृतीय पंथी मतदार आहे. या एकूण मतदारांमध्ये ६५७० दिव्यांग मतदार आणि ८० वर्षांवरील १९२४४ मतदार समाविष्ट आहेत. तसेच ११४ अनिवासी भारतीय ३८ सैनिक मतदार या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहे.


9 मतदार केंद्र संवेदनशील: या मतदान प्रकियेसाठी २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये ५१० व २१५ कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये २७० मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत. मतदारांना मतदान प्रकियेमध्ये सुलभरित्या सहभागी होता यावे, याकरिता या सर्व मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये १३ व २१५ - कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये ९ मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. दोन्ही मतदार संघात एकूण मतदान केंद्राच्या १० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून त्यात या संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.

अधिकारी वर्ग पुण्यात दाखल:निवडणूक प्रकियेच्या संचालनाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत दोन सर्वसाधारण निरिक्षक, दोन पोलिस निरिक्षक व दोन खर्च निरिक्षकांची नेमणूक केलेली असून ते सर्व ०६-०२-२०२३ रोजी पुण्यात दाखल झालेले आहे. दोन्ही मतदार संघात निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन घेण्यात आलेला असून चिंचवड मतदार संघाकरिता २५५० व कसबापेठ मतदार संघाकरिता १३५० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण दि. १२-०२-२०२३ रोजी घेण्यात आलेले असून दुसरे व तिसरे प्रशिक्षण अनुक्रमे दि. १८ व २५ फेब्रुवारी घेण्यात येणार आहे. २०५ - चिंचवड मतदार संघामध्ये ४७ व २१५ कसबापेठ मतदार संघामध्ये २५ झोनल अधिकाऱ्यांची तसेच संवेदनशील मतदान केंद्रासाठी २०५ चिंचवडमध्ये १५ व २१५ कसबापेठ मतदार संघात ११ सुक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सुक्ष्म निरिक्षकांचे पहिले प्रशिक्षण दि. १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे स्तरावर सर्वसाधारण निरिक्षकांचे उपस्थित घेणेत आलेले आहे. व दूसरे प्रशिक्षण २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

सुरक्षा दलाची तैनाती: पोट निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, निवडणूक प्रकिया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी २०५ चिंचवड मतदार संघाकरिता CRPF CISF, ITBP च्या प्रत्येकी १ कंपनी RPF च्या २ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. तसेच, २१५ कसबापेठ मतदार संघाकरिता CAPF च्या ५ कंपन्या दाखल झालेल्या आहेत. तसेच, पुणे शहर पोलिस विभागाकडून २१५ कसबापेठ साठी १५०० पोलिस तर पिंपरी चिंचवड पोलिस विभागाकडून २०५ चिंचवड मतदार संघासाठी ८३६ पोलिस व १६९ होमगार्ड मार्फत बंदोबस्त पुरविला जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत निवडणूक प्रकिये दरम्यान उपलब्ध करुन देण्यात आलेल्या VIGIL सुविधे अंतर्गत चिंचवड मतदार संघात एकूण १० व कसबापेठ मतदार संघात एकूण ५३ तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. या सर्व तक्रारीवर कार्यवाही करण्यात आलेली आहे.

दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा:भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी तसेच ८० वर्षांवरील आणि कोरोना बाधीत रुग्णांना त्यांचा मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा याकरिता Postal Ballot ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. चिंचवड मतदार संघामध्ये १२३१३ दिव्यांग मतदार व ८० वर्षांवरील १९२६ मतदार तसेच, कसबापेठ मतदार संघामध्ये ६५७० दिव्यांग मतदार व ८० वर्षावरील १९२४४ मतदार समाविष्ट आहेत. या मतदारांना Postal Ballot द्वारे मतदान करता यावे याकरिता फॉर्म क्र. १२ डी चे वाटप करण्यात आले आहे. तसेच, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सुविधा उदा. रॅम्प, व्हीलचेअर्स व मॅग्नीफाइंग ग्लास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.


निःपक्षपाती मतदानासाठी उपाययोजना: मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या वेळी २०५ चिंचवड मतदार संघामध्ये ५५.८८ टक्के व २१५ कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये ५१.५४ टक्के मतदान झाले आहे. तरी मतदारांनी या पोट निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच, निःपक्षपाती पणे व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मतदान करावे यासाठी जिल्हास्तरावरुन व मतदार संघस्तरावरुन स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज अखेरपर्यंत दोन्ही मतदार संघात मिळून ELC, VAF, चुनाव पाठशाळांमार्फत, सांस्कृतिक कार्यक्रम रॅली, पथनाटय, विविधस्पर्धा असे एकूण ४१८ कार्यक्रम घेण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. तसेच, दोन्ही मतदार संघस्तरावरुन मतदारांना मतदार ओळखचिठ्ठीचे आणि मतदार मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा:Mumbai Crime: तृतीयपंथीची दादागिरी थांबेना; प्रवाशाला मारहाण करून हिसकावला मोबाईल

ABOUT THE AUTHOR

...view details