पिंपरी-चिंचवड (पुणे) - रोहित्राचा भीषण स्फोट होऊन त्यातील ऑइल अंगावर उडाल्याने चार महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजी गंभीर जखमी झाल्याची घटना काल (शनिवार) पिंपरी-चिंचवडमध्ये घडली होती. घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, आज (रविवार) पहाटे उपचारादरम्यान चिमुकली शिवानी काकडे आणि तिची 51 वर्षीय आजी शारदा कोतवाल या दोघांचा मृत्यू झाला तर शिवानीची आई हर्षदा काकडे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी भोसरी इंद्रायणीनगर येथे रोहित्राचा भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. डीपीतील ऑइल शेजारी असलेल्या राजवाडा या इमारतीवर उडाले. त्यावेळी अंगणातील मोकळ्या जागेत हर्षदा या त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला अंघोळ घालत होत्या. त्यांच्या आई शारदा या त्यांच्याजवळच होत्या. त्यावेळी हे गरम ऑइल तिघींच्याही अंगावर पडल्याने सर्वजण गंभीररीत्या भाजल्या. चिमुकल्या शिवानीला आंघोळ घातली जात असल्याने तिच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे उष्ण ऑइल थेट तिच्या शरीरावर पडल्याने ती 60 टक्के टक्के भाजली.