पुणे : येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
पुणेरी पगडी घालून स्वागत : आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशाच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते. बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.