पुणे -शहरातील बोहरी आळी मार्केट म्हणजे स्टेशनरीपासून ते फर्निचरपर्यंत अनेक वस्तू मिळण्याचे शहरवासियांचे हक्काचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिक कित्येक वर्षापासून व्यवसाय करतात. मात्र, नोटबंदीचा फटका येथील छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. मागील 3 वर्षांपासून त्यांच्या व्यवसाय अडचणीत सापडला आहे आणि अजूनही त्यांची गाडी व्यवसाय रुळावर येऊ शकला नाही.
याच बोहरी आळीत लेदर बॅगचे विक्रेते असलेले गजानन फडतरे यांनी सांगितले, "नोटबंदीनंतर व्यवसाय 50 टक्क्यांनी कमी झाला. ग्राहक कमी झाले आहेत, त्यात ऑनलाइनमुळे व्यवसायावर आणखी परिणाम झाला आहे. लोकांचा ऑनलाइन खरेदीकडे जास्त कल आहे. नोटबंदी होऊन 3 वर्षे झाली. मात्र, फारसा काही फरक पडला नाही. व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरून पाहिले. मात्र, काही फायदा नाही झालेला नाही. एवढेच नव्हे तर नोटाबंदीमुळे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले, असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा -सेनाभवनातील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून जिल्हाध्यक्षांना शेतकरी मदतीचे आदेश
याच मार्केटमध्ये कपडा विक्री करणारे क्रिपालसिंग हुडांनी सांगितले, "15 वर्षांपासून मी या बाजारात कपडे विक्री करतो. नोटबंदीनंतर आमचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. एकप्रकारे मंदी सुरू झाली. ग्राहक येतात मात्र, पूर्वीसारखी खरेदी करीत नाहीत. खूप विचारपूर्वक खरेदी करतात. आधी दोन ड्रेस विकत घेणारे आता एकच घेतात. अशा परिस्थितीत 30 टक्क्यांनी व्यवसाय घटला असल्याचेही ते म्हणाले.
या व्यापाऱ्यांसारखीच अवस्था येथील इतर व्यापाऱ्यांची आहे. अजूनही त्यांची गाडी रुळावर आली नाही. एकंदरितरित्या नोटाबंदीमुळे 'अच्छे दिन' तर नाहीच मात्र, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाल्याचे अनेकांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतीय चलनातून जुन्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. त्याला आज (शुक्रवारी) 3 वर्षे पूर्ण झाली. या निर्णयामुळे काळा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेतील बाद होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. मात्र, याच्या प्रत्यक्ष उलटे झाले. बाद केलेल्या जुन्या नोटांपैकी तब्बल 99 टक्के नोटा या बँकेत परत आल्या. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेक महिने चलन तुटवडा निर्माण झाला होता. अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यांच्या या निर्णयाचे परिणाम आजही काही उद्योगांना भोगावे लागत आहेत.
हेही वाचा -रामदास आठवलेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चेला उधाण