जुन्नर (पुणे) - गोठ्यावरून गेलेल्या वीजवाहक तारा तुटून गोठ्यात वीजप्रवाह आल्याने गोठ्यातील ५ गायींपैकी ३ गायींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हिवरे तर्फे नारायणगावातील एकनाथ भिमाजी कुंडलिक यांच्या गोठ्यात घडली.
एकनाथ कुंडलिक यांच्या पत्नी आणि पुतण्यालाही विजेचा धक्का -
गायींच्या दुग्धव्यवसायावर एकनाथ कुंडलिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोठ्यावरून गेलेल्या तीन वीज वाहक तारा अचानक तुटून गोठ्यावर पडल्या. वीज वाहक तारा गोठ्यावर पडताच क्षणी गोठ्यात सर्वत्र विजेचा प्रवाह पसरला. यावेळी गोठ्यात बांधलेल्या ५ गायींपैकी ३ गायींचा तडफडून जागेवरच मृत्यू झाला. यावेळी एकनाथ कुंडलिक यांच्या पत्नी वर्षा एकनाथ कुंडलिक व पुतण्या युवराज दगडू कुंडलिक यांनी तत्काळ गोठ्याचा दरवाजा उघडून गोठ्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण गोठ्यात विजेचा प्रवाह पसरल्याने दरवाजाला हात लावताच वर्षा कुंडलिक व युवराज कुंडलिक हे दोघेही विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले. सुदैवाने ते बचावले गेले.