पुणे- खंडणी, दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड यांनी 3 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 12 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या जप्त केलल्या दुचाकींची किंमत 7 लाख 85 हजार इतकी आहे.
प्रवीण चंद्रकांत भंडारे (वय-20 रा. निगडी), अमोल उर्फ बाळा अनंत जाधव (वय-19 रा.चिखली), सागर उर्फ लाला गगलानी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात 3 दुचाकी चोरांना अटक याबाबत अधिक माहिती अशी, की निगडी परिसरात खंडणी दरोडा विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे यांना अंकुश चौक येथे आरोपी प्रवीण भंडारे हा थांबला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता, साथीदार अमोल उर्फ बाळा अनंत जाधव याच्यासह तो दुचाकी आणि तीनचाकी गाड्या चोरत असल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी 5 लाख 25 हजार रुपयांच्या गाड्या हस्तगत केल्या.
याबरोबरच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांनी सराईत गुन्हेगार सागर उर्फ लाला गगलानी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांच्या 6 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.