पुणे- जिल्ह्यात सध्या काही प्रमाणात धोकादायक असलेल्या म्युकरमाकोसिसचे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आतापर्यंत तब्बल २७० नागरिकांना याची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने टास्क फोर्स नेमला आहे. यामाध्यमातून या जीवघेण्या आजारासंदर्भात त्यांच्यावर उपचार कसे करावे, यासाठी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) विकसित करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीवेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी याबाबतची माहिती दिली.
आरोग्य तज्ञांच्या माहितीनुसार नाक बंद होणे, चेहऱ्याचा अर्धा भागात संवेदनाहिन होणे, डोळ्यांमध्ये सूज येणे, अंधारी येणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, ताप येणे यासारखी या म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आहेत. तसेच मेंदू विकार, मधूमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ही काळी बुरशी धोकादायक ठरू शकते. सध्या पुणे जिल्ह्यात तब्बल २७० जण या म्युकरमायकोसिसने बाधित आढळून आले आहेत.
म्युकरमायकोसिस हा कोरोनाबाधित रुग्ण अथाव कोरोनातून बरा झालेल्या रुग्णात आढळून आला आहे. पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आतापर्यंत जवळपास 270 रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर "आमचे विभागीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ. भारत पुरंदरे यांनी म्युकरमायकोसिसच्या व्यवस्थापनासाठी सविस्तर कार्यप्रणाली तयार केली आहे. टास्कफोर्सच्या कार्यप्रणालीनुसार निर्धारित करण्यात आलेली कार्यप्रणाली राज्यातील सर्व रुग्णालयांना वितरीत करण्यात आली आहे. आम्ही रुग्णालयांना टास्कफोर्सने निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक कार्यप्रणालीचा अवलंब करण्याच्या सुचना केल्या असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
म्युकरमायकोसिसमुळे झालेले बाधित आणि आतापर्यंत झालेले मृत्यू या संदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केवळ ते ४ ते ५ रुग्ण या बुरशीजन्य संसर्गाने बाधित आढळून आले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढली आहे. या काळ्या बुरशीबाबत बोलताना नोबेल रुग्णालयाचे डॉ अभिषेक घोष त्यांच्या रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिस बाधित असलेले ४० रुग्ण भरती झाले आहेत. ही संख्या खूप मोठी आहे. विशेषता कोरोना बाधित रुग्ण आणि ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये ब्लॅक फंगलची बाधा आढळून आल्याचेही ते म्हणाले.
जर या काळ्या बुरशीचा संसर्ग झालेला रुग्ण तत्काळ रुग्णालयात दाखल झाला तर त्याच्या दृष्टीला काही धोका होणार नाही. तो विनाशस्त्रक्रिया बरा होऊ शकतो. मात्र, रुग्णाचा अहवाल उशिरा आला, आणि बुरशीचा संसर्ग वाढला तर मात्र, तो संर्सग बाधित डोळा काढण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचेही डॉक्टर घोष यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा प्रकारे एका २८ वर्षीय रुग्णांचा एक डोळा काढण्यात आल्याचीही माहितीही त्यांनी यावेळी दिली.