महाराष्ट्र

maharashtra

पोपट पिंजऱ्यात कैद करणे पडले महागात, न्यायालयाने सुनावला 25 हजाराचा दंड

By

Published : Feb 2, 2020, 12:17 PM IST

पुण्यातील एका व्यक्तीने आपल्या रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याला न्यायालयाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

parrot
पोपट

पुणे- शहरातील एका व्यक्तीला पोपटाला पिंजऱ्यात बंद करणे, चांगलेच महागात पडले आहे. लोणावळ्यातील 'मिस्टीका' रिसॉर्टमध्ये एका देशी पोपटाला कैद केले होते. त्यामुळे संबंधित मालकाला वडगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. मुळीक यांनी 25 हजार रुपयांचा दंड आणि 10 झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. या घटनेप्रकरणी वनरक्षक गणेश झिरपे यांनी तक्रार दाखल केली होती.

सोमनाथ ताकवले, वन अधिकारी, मावळ

मिस्टीका रिसॉर्टमध्ये एक देशी पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवला असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रिसॉर्टचे मालक पी. टी. गिरीमोहन यांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वनविभागाने सदर रिसॉर्टमध्ये छापा मारून पिंजरा आणि पोपट ताब्यात घेतले. दरम्यान, पोपटाला निसर्गात मुक्त करण्यात आले असून मालक गिरीमोहन याच्यावर वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

त्यावेळी वडगाव न्यायालयाने गिरीमोहनला 25 हजार रुपये दंड आणि 10 आठ फुटी झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. तसेच वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी कोणी पोपटाला पिंजऱ्यात बंद करत असेल, तर याबाबत माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच पोपट पिंजऱ्यात बंदिस्त करणे, हा गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details